काही दिवसांपूर्वी मी ट्रेन मधून मुंबईला जात होते . माझ्या समोरच्या सीटवर एक आई व तिची दोन मुलं असे बसले होते . मुलगा मोठा होता १३-१४ वर्षांचा आणि मुलगी लहान होती ६-७ वर्षांची. ह्या मुलांनी आळीपाळीने window सीटवर बसण्याचे ठरविले. जेव्हा मुलगी window सीटवर होती तेव्हा ती खूप खुश होती पण जेव्हा तिचा दादा window सीटवर आला तेव्हा मात्र ती कंटाळली. खूप कुरकुर करू लागली. तेव्हा तिची आई तिला म्हणाली की चल आपण नावाच्या भेंड्या खेळूया. मुलीने सुरुवातीला तिला माहिती असलेली बरीच नावे सांगितली, मग मात्र तिची पंचाईत झाली. तिला अजून नावं सांगता येईना तेव्हा तिच्या दादाने तिला मदत करायला सुरुवात केली, तिनेही नकळतपणे ती मदत घेतली. तिच्या दादाची आपल्या बहिणीला संकटात बघून तिला मदत करायची वृत्ती मला खूप आवडली, पण एक अक्षर असं आलं जेव्हा त्या दोघांनी वेगवेगळी नावं सांगितली. तेव्हा त्या मुलीने आईकडे तक्रार केली, "आई, बघ ना, हा दादा मध्ये मध्ये बोलतोय." मग तिच्या आईने तिला समजाविले की, "अगं, आता तुला मदतीची गरज नाही म्हणून तू दादाला नाही म्हणतेस. मग आधी तू त्याची मदत का घेतलीस?" त्या मुलीला ह्यातलं किती कळलं माहिती नाही पण तिच्या आईने तिला नकळत तिच्या दादाचं महत्त्व समजाविले होतं आणि आपल्या वाईट प्रसंगीच तर आपले आपल्याला मदत करतात हे पण पटवून दिलं होत. हीच गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्शून गेली आणि आपण जर लहान मुलांना त्यांच्या कलेने कोणती गोष्ट पटवून दिली तर ती त्यांना नक्की कळते हे पण पटले.